मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दुपारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यावर टीका केली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे सचिन वाझे असलेल्या प्रवीण कलमे यांनी माझ्या विरोधात आरोप केले. ते प्रवीण कलमे कुठे आहेत, असा खोचक सवाल किरीट यांनी केला होता. त्यावर प्रविण कलमे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली.
किरीट सोमय्या यांचे आरोप हास्यास्पद आहेत. मी फरार नसून कामानिमित्त बाहेर आहे. माझे काम संपले की मी मुंबईत येणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर एफआयआरची कॉपी मला अजून मिळालेली नाही. ती त्यांना कोठून मिळाली. किरीट सोमय्या यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती प्रवीण कलमे यांनी दिली आहे.
मला वसूलीच्या आरोपांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, हे माझ्याविरोधात रचलेलं कटकारस्थान आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याशी माझा दूरदूरपर्यंत संबंध नाही, त्यांच्याकडे मी तक्रारी करतोय, त्याच्यावर त्यांच्याकडून कारवाई झाली नाही. ते नेमकं कोणाला वाचवतायत हा प्रश्न आहे. ते ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या विभागाच्या एफआयआरची कॉपी मला मिळत नाही, ती किरीट सोमय्या यांना मिळते. सोमय्या आरोप करतायत की आव्हाड मला वाचवतायत, तर मग जितेंद्र आव्हाड मला वाचवतायत की जितेंद्र आव्हाड आणि सोमय्या एकत्र येऊन त्या विकसकाला वाचवतायत हा प्रश्न आहे, असे कलमे म्हणाले.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रविण कलमे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सोमय्या यांनी केला. माझ्याविरोधात काही महिन्यांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप करणारे प्रवीण कलमे बेपत्ता आहे. पण आता त्यांच्याविरुद्धच एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रवीण कलमे गायब आहे. तो भारतात आहे की विदेशात आहे? हे सरकारने स्पष्ट करावे. त्या प्रवीण कलमेंना मदत जितेंद्र आव्हाडांनी केली, परबांनी केली की उद्धव ठाकरेंनी केली, हे स्पष्ट करावे. या माणसाला फरार घोषित करणार का? असा सवालही किरीट सोमय्यांनी यावेळी केला. तसेच, प्रवीण कलमेविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मग सरकारने त्याला अद्याप फरार घोषित का केले नाही. त्याला कोण वाचवत आहे, असा सवालही सोमय्यांनी केला.
कोण आहेत प्रवीण कलमे?
प्रवीण कलमे हे एनजीओचे संस्थापक आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडामधून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते आणि हे काम प्रवीण कलमे यांना सोपवण्यात आले होते, असा दावा किरीट यांनी केला होता. यावर कलमेंनी अब्रू नुकसानीचा दावा टाकला होता.



