मुंबई : अजित पवार यांनी राज्यात सर्व अंदाज फोल ठरवत स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारवरून जोरदार चिमटे काढले. तसेच भाजपा नेत्यांच्या अपेक्षाभंगावरून राजकीय टोलेबाजी केली. “देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितल्यावर भाजपाचे कितीतरी नेते ढसाढसा रडायला लागले. सगळ्या महाराष्ट्राला तो धक्का होता,” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, भाजपमधील अनेक कट्टर काम करणारे मान्यवर थोडेसे नाराज आहेत. देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितलं तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. सगळ्या महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता. गिरीश महाजन डोक्यातील फेटा डोळ्यावर घेऊन अश्रू पुसत होते अजूनही त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबत नाही अशा शैलीत अजित पवार यांनी फटकेबाजी केली.



