मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या साथीनं नवं सरकार आलं. यानंतर आता एकनाथ शिंदे समर्थक आमदारांकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला जात आहे. आमदार संजय राठोड, आमदार शंभुराज देसाई यांच्यानंतर आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवत आहेत आणि इकडे हे आमची पदं काढत आहेत, संजय राऊत तोंडाला येईल ते बोलत आहेत, म्हणून आमचं एक एक पाऊल पुढे पडत गेलं, अशा शब्दात भरत गोगावले यांनी राऊतांवर हल्ला चढवला.
- संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली होती?
भरत गोगावले म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराचसा अवधी दिला होता. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही असं ते सांगत होते पण इकडे आमच्या एक एका लोकांची पदं काढली जात होती. या सगळ्या अनुषंगाने आणि संजय राऊतांचं जे वक्तव्य येत होतं हे काळजाला घरं पाडणारं होतं, लोकांना चिड आणणारं होतं. उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांना आमच्याशी चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवत आहेत आणि इकडे हे आमची पदं काढत आहेत, संजय राऊत तोंडाला येईल ते बोलत आहेत, म्हणून आमचं एक एक पाऊल पुढे पडत गेलं. नाहीतर आम्ही त्या स्थितीत होतो. आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि निर्णय घ्यायला लावला.
त्यांनीही सांगितलं की तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडा. वरची लोकं आपल्यासोबत यायला तयार आहे. परंतु ते आमचं काहीही ऐकून न घेता फक्त वन मॅन शो संजय राऊत. त्यांना वाटलं मागच्यावेळी ज्या घडामोडी झाल्या तशा यावेळेला होतील. पण तसं नव्हतं. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर पाईक आहोत. मोडेन पण वाकणार नाही म्हणून आम्ही पुढे जात होतो. संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली होती ते आम्हाला काही कळलं नाही.



