पिंपरी : केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात काल पन्नास रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट आणखी कोलमडलं आहे. त्याच्या निषेधार्थ तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात भाजपप्रणित केंद्र सरकारचा गुरुवारी (ता.७) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉग्रेसने भर पावसात आंदोलन करीत निषेध केला. यावेळी “काय झाडी, काय डोंगार, काय दरवाढ,” ही आंदोलक महिलांची घोषणा लक्षवेधी ठरली.
वाढत्या महागाईचा फटका भाजपला पिंपरी महापलिकच्या आगामी निवडणुकीत बसणार असल्याचा दावा यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला. केंद्र सरकारमधील भाजपच्या धोरणामुळे देशातील श्रीमंत अधिक श्रीमंत,तर गरीब हा अधिक गरीब होत चालला असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ज्या पद्धतीने राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता व सरकार घालवले त्यातून राज्यात लोकशाही राहिली नसून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु झाल्याची टीका त्यांनी केली. `कोविडने धाडले घोडे अन् महागाईने मोडले कंबरडे` असे भाष्य कालच्या गॅस दरवाढीवर राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा.कविता आल्हाट यांनी केले.
कालच्या गॅस दवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आज राज्यभर केंद्रातील भाजप सरकारविरोधात आंदोलन केले.पिंपरीतही ते आंदोलन चौक अशी ओळख असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले.त्यात अजित गव्हाणे, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, उपाध्यक्ष शिरीष साठे, अर्बन सेना अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते.
कविता आल्हाट, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, कार्याध्यक्षा उज्वला ढोरे, विधानसभा पिंपरी विधानसभा अध्यक्षा रमा ओव्हाळ, महिला मुख्य संघटिका मीरा कदम, माजी नगरसेविका माया बारणे, ओबीसी सेल अध्यक्ष निर्मला माने, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, उपाध्यक्ष शिरीष साठे, अर्बन सेना अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदींनी यावेळी शिवसेना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सध्या गाजत असलेल्या “काय ती झाडी..” या मोबाईल संभाषणाचा आधार महागाईविरोधातील आंदोलनासाठी घेतला.




