वडगाव मावळ : पवन मावळातील बौर येथील स्वामी समर्थ इंग्लिश स्कुलमध्ये शुक्रवारी (दि.८) दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रि-प्रायमरी व इयत्ता १ ली ते ६ वीच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपारिक पोशाख परिधान करत दिंडी काढली. कोरोना काळात २ वर्षे दिंडीला परवानगी मिळाली नव्हती. मात्र आता मोठ्या संख्येने वारकरी समुदाय भक्ती-भावाने वारीला हजेरी लावताना दिसत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनीही मागे राहू नये. व त्यांनाही आपल्या वारकरी परंपरेची ओळख व्हावी यासाठी बौर येथील स्वामी समर्थ इग्लिंश स्कुलमधील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार (दि. ०८) शाळेकडून दिंडी काढण्यात आली होती.

सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची व दिंडीची शोभा वाढवली. स्वामी समर्थ इंग्लिश स्कुलमधुन निघालेली ही दिंडी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये थोडावेळ विसावली. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून दिंडीची सांगता करण्यात आली.




