वडगाव मावळ :- मुंबई पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत असल्याने सेवा रस्त्यास नदीचे स्वरूप आले आहे. सेवा रस्त्यावर येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून येथून प्रवास करावा लागतो आहे.
वडगाव मावळ येथे मागील दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी (दि.९) जुना मुंबई पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या येथील सेवा रस्त्याचे काम अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन साचत आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लवकरात लवकर या सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. किमान पावसाळ्यात सेवा रस्त्यावर येणारे पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा पुढील आठवड्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी एमएसआरडीसी यांना दिला आहे.




