पुणे : मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केल्यामुळे महागाईचा ग्राहकांना मोठा भुर्दंड बसत आहे. विशेष म्हणजे दरवाढ होण्यापूर्वी ज्या ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंगद्वारे सिलिंडर खरेदी केले होते, त्यांच्याकडूनही अतिरिक्त ५० रुपयांची मागणी हाेत आहे. या वाढीव दरासह खुशालीच्या नावाखाली गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉय ग्राहकांना १० ते २० रुपये घेवून लूटत असल्याने दिसून येत आहे.
वाढीव गॅस सिलिंडर बाबत विचारणा केल्यास डिलिव्हरीच्या दिवशीचा दर लागू होईल, असे कंपन्यांचे अधिकारी सांगत आहेत. यावरून ग्राहकांच्या लुटीकडे कंपन्या कानाडोळा करत आहेत. दररोज अनेक ग्राहक गॅस सिलिंडर बुकिंग करत असतात. बहुसंख्य ग्राहक तंत्रस्नेही झाल्याने ते फोन पे, गुगल पे, एचपी पे आदी ॲपवरूनच गॅस बुकिंग करतात. लगेचच पैसेही पे करतात. त्यावेळची पूर्ण किंमत ग्राहक मोजतात. सिलिंडरची दरवाढ केव्हा होईल याची त्यांना कल्पनाही नसते.
त्यामुळे बुकिंग केलेल्या दिवशीची दर आकारणी केली जाते. मात्र, बुधवारी झालेल्या दरवाढीपूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांना दरवाढ झाल्यानंतर सिलिंडर दिले गेले. विशेष म्हणजे सिलिंडर देण्याच्यावेळी ग्राहकांकडून अतिरिक्त ५० रुपयांची मागणी डिलिव्हरी बॉय करताना दिसून येते त्यामुळे नागरिक यांच्यासोबत त्याचे तीव्र वाद होत आहेत.




