- रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी वाळू विक्रीत १५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रीपद देऊ नका, अशी मागणी भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष व रामटेक विधानसभा क्षेत्राचे प्रभारी डॉ. राजेश ठाकरे यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत केली. विशेष म्हणजे, शिंदे गटात सामील होऊन भाजपची आश्रयछाया मिळवणाऱ्या जयस्वाल यांच्या विरुद्ध भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने इतके गंभीर आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आ. जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाराची सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून आ. जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार आहे.
आ. जयस्वाल यांचा रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीवर डोळा आहे. खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल १५० कोटींचा गैरव्यवहार व खनिज विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सत्तेचा दुरुपयोग केला. खिंडसी ते वैनगंगा-सूर नदीतील रेती उपसता यावी, यासाठी जयस्वाल यांनी गरिबांच्या घरासाठी मातीमिश्रीत वाळूच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या माध्यमातून वाळू तस्करी केली. यापूर्वीसुद्धा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ. जयस्वालांवर ३०० कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप करून चौकशीची मागणी केली होती. त्यावरून चौकशीस सुरवातही झाली होती.



