देहूगाव (वार्ताहर) आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी निमित्त तिर्थक्षेत्र देहूच्या मुख्यमंदीर आणि वैकुंठस्थान मंदीरात भावीकांनी रविवारी ( दि.१० ) पहाटे पासूनच दर्शनार्थ गर्दी केली होती. कोरोना महामारी संकटामुळे गत दोन वर्षांपासून भाविकांना दर्शन घेता न आल्याने यंदा भर पावसातही भाविकांचा उत्साह दिसून येत होता तर वाढत्या गर्दीमुळे परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
युगेन युग कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असणारा श्री विठ्ठल अर्थात पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.अनेक संतांनी आपल्या वाणी,काव्य,अभंग, रचनांमधून विठ्ठलाची आळवणी केली तर कधी त्याला आपला सखा, मित्र मानून आपले सुख-दु:ख त्याला सांगितले.या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरा मध्ये लाखो भाविक भक्तांची अर्थात वारकऱ्यांची मांदियाळीचे एकत्रित आगमन होत असते.
तिर्थक्षेत्र देहू हून श्री संत तुकाराम महाराज यांची तीर्थक्षेत्र आळंदी होऊन संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातूनही अनेक संतांच्या पालखी सोहळा पंढरपूर मध्ये दाखल होत असतात. या पालखी सोहळयात समावेश न होवू शकणारे वारकरी,भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त देहूनगरीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री विठ्ठल रूक्मीणीच्या दर्शनार्थ पहाटे पासुनच गर्दी केली होती.दोन वर्ष कोरोना महामारी संकटाने भाविकांना दर्शना पासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे यंदा भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याची दिसून आली. मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भाविकांच्या गर्दीने जणू परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
पहाटे पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावर भाविकांनी स्नान करण्यासाठी गर्दी केली होती.मावळ तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसाने इंद्रायणी नदीपात्र दुथडी भरून वाहत होते. मुख्य मंदिरातील भजनी मंडपामध्ये भजनी मंडळाचे भजन सुरू होते . रिप रिपत्या पावसातही भाविकांच्या घाटावरील,मंदीर परीसरातील गर्दीने ,मंदिरातील आकर्षक फुलांच्या सजावटीने ,भक्तिमय वातावरण तर प्रसन्न दृश्य व मनमोहक झाले होते. ” ज्ञानोबा माऊली,ज्ञानराज माउली तुकाराम, तुकाराम तुकाराम” हरि नामाच्या जय घोषाने देहूनगरी भक्तीरसात न्हावून निघत होती. मुख्य मंदिरामध्ये भाविकांना दर्शन बारीने दर्शनासाठी येत होते. वाढत्या गर्दीमुळे मंदिरात दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून रांगा लावण्यात आले होते .तर श्री संत तुकाराम जन्मस्थान मंदिर व वैकुंठगमन स्थान मंदिरात दर्शनार्थ लांब रागा लागल्या होते.




