- उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांचे मार्गदर्शन
बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्यात शुक्रवार दि.८ जुलै रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की येणाऱ्या आषाढी एकादशी,ईद त्याचबरोबर आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य कोणीही करु नका कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी सर्वांनी घ्यावी तसेच सणाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर त्याचबरोबर कोणीही कायदा हातात घेऊन शांतता सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
कोणतीही अडचण असल्यास पोलिसांकडे तक्रार करा पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करुन त्यावर योग्य ती कारवाई करेल अशा मार्गदर्शक सुचना दिल्या व सर्वांना येणाऱ्या सणांसांठी श्रीवर्धन पोलीस प्रशासनाकडून शुभेच्छा दिल्या.
दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानताना सांगितलं की आपला विभाग शांतताप्रिय आहे आणि आपल्या भागात शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचा विश्वास आपण दिला आहे.त्यामुळे अशी शांतता यापुढेही कायम राहील याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर आपण ज्या काही समस्या मांडल्यात त्यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शाम मोरे पोलीस कर्मचारी संदीप चव्हाण दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील,मोहल्ला कमिटी सदस्य,ग्रामरक्षक, विविध समाज व राजकीय पक्षाचे अध्यक्ष,पत्रकार उपस्थित होते.



