लोणावळा : लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेला एक तरुण येथील भुशी धरणात बुडाल्याची घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. साहिल सरोज (वय-19, रा. मुंबई) असे या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार 250 जणांचा एक ग्रुप लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आला होता. त्यात साहिल याचा समावेश होता. भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्याखाली हे सर्व पाण्यात भिजण्याचा आंनद घेत असताना, साहिल याचा पाय घसरुन तो पडला व वाहून भुशी धरणात गेला आहे. त्याचे शोध कार्य सुरू झाले असून लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग रेस्कू पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

आज सोमवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी आणि त्यातून वाढलेला अपघाताचा धोका लक्षात घेत लोणावळा नगरपरिषद तसेच लोणावळा पोलिसांकडून संध्याकाळी 5 वाजल्यानंतर भुशी धरणाकडे जाणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली असून तसे सुचनाफलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मालकीचे असणारे हे धरण मागील अनेक वर्षांपासून लोणावळ्यातील पर्यटनाचे प्रमुख केंद्रबिंदू राहिलेले आहे. दरवर्षी साधारण जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे धरण १००% भरते. पावसाळ्यात हे धरण कधी एकदा पूर्ण भरते आणि त्यातील पाणी येथील पायऱ्यांवरून वाहु लागते याची वाट पर्यटक मोठ्या आतुरतेने बघत असतात. पण एकदा का हे धरण त्याच्या पूर्ण क्षमतेने भरून वाहायला लागले की याठिकाणी पर्यटकांची अक्षरशः जत्रा भरते. भुशी धरणाच्या मागील बाजूस अनेक धबधबे असून धरणाच्या पायऱ्यांसोबतच अनेक उत्साही पर्यटक या धबधब्याखाली जाऊन मौजमस्ती करण्याचा प्रयत्न करतात. मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असताना पाण्यात उतरण्याचा पराक्रम करणं अनेकदा या अतिउत्साही नागरिकांच्या जीवावर बेतते.
सध्या लोणावळा शहरात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्याने धरणाच्या पाण्यात जाणं धोकादायक असल्याने प्रशासनाने सायंकाळी 5 नंतर भुशी धरणाकडे जाणारी वाहनं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर देखील या निर्णयामुळे परिणाम होणार आहे. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आणला जाणार की इतर निर्णयाप्रमाणे बोलचाच भात आणि बोलाचीच कढी बनून राहणार हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.




