पिंपरी १३ जुलै : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील शाळांना १४ ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक भयानक चित्र मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यामध्ये आहे. मुसळधार पावसामुळे या चारही तालुक्यातील नद्यांना पूर आले आहेत. अनेक दुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र अशावेळी एकीकडे विद्यार्थ्यांना सुट्टी दिली तर दुसरीकडे शिक्षकांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे प्रशासनाकडून शिक्षकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे माहिती समोर आली आहे.
पुणे शहर पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागात 14 ते 16 जुलै अशी तीन दिवस शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर या तालुक्यांतील शाळांनी स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याने पुढील ४८ तासात राज्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
गेले चार दिवस पावसाने पुणे शहरातही दमदार हजेरी लावली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची काळजी घेता उद्या १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, मनपा, खाजगी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. तर, आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने शिक्षकांनी शाळेत हजर राहावे असे देखील शासनाने म्हंटले आहे. मात्र मावळ व मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.




