पिंपरी: मागील तीन दिवसापासून सुरू असल्यामुळे पिंपरी चिंचवडसह उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शरद अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी पाणी साठल्याचे चित्र दिसत आहे. काही सकल भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबले आहे.
दिवसभराच्या मुसळधार पावसाने बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे. कमी उंचीच्या अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावर वाहतूक मंदावली होती. मावळ तालुक्यात व पिंपरी चिंचवड शहरात गेले एक आठवडा मुसळधार पाऊस होत असल्याने पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दुथडी भरून वाहत आहे.
मोरया गोसावी मंदीर पाण्यात

चिंचवडगावमधील सुप्रसिद्ध मोरया गोसावी मंदिराच्या आवरात शिरले आहे. रावेतमधील नागरिक प्राजक्ता रुद्रावर म्हणाल्या, की शिंदेवस्ती पाईपलाईन रस्ता हा पाण्यात बुडाल्याने लोक त्याचा वापर करू शकत नाही. औंध – किवळे बीआरटी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. पुनावळे ताथवडे व वाल्हेकर वाडीतील पुलाखाली सकल भागात पाणी साचले आहे. सेलेस्टीअल सिटी सोसायटी ते सिटी प्राईड स्कूल रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पाण्यातून जावे लागत आहे.

मोशीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. देहू-आळंदी रोडवरील रिव्हर रेसिडेन्सी चौकाजवळील दीपक स्वीट्स जवळ खड्डयांचा त्रास वाहनचालकांना होत आहे. चिंचवडमधील नागरिक स्वानंद राजपाठक म्हणाले, की मोरया हॉस्पिटल चौकहून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले आहे. पिंपरी लिंकरोडवर दर्शन हॉल चौक व तुळशीदास मॉलजवळ रस्त्यावे पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.
पिंपळे गुरव – नवी सांगवी रस्त्यावरील कृष्णा चौक येथे रस्त्यावरून पाणी सकाळपासून वाहत होते. जुनी सांगवीतील एसटी कॉलनीमध्ये एक झाड दुपारी पडले आहे. वाकड मधील नागरिक रोहित सावंत म्हणाले, की वाकड चौकाचे पुढे हिंजवडीला जाण्यासाठी पुणे बंगलोर हायवे खालील बोगद्यामध्ये पाणी साचले होते. आनंद देव म्हणाले, की पुणे – बेंगलोर हायवेवरील भूमकर चौकातील बोगद्यामध्ये पाणी साचल्याने वाकडहून हिंजवडीला जाणारी वाहतूक ठप्प होऊन लांब रांगा लागल्या होत्या.




