पिंपरी: मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडसह उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर स्मार्ट पिंपळे सौदागर परिसरात अनेक सोसायटी भागात पाणी साचले आहे. काही सोसायटी प्रवेशद्वार पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना येजा करताना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या लक्षात घेता स्थानिक मा. नगरसेवक नाना काटे यांनी पालिका प्रशासनाच्या मदतीने प्रभागातील विविध भागात पाहणी केली आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करून देण्याच्या सूचना दिल्या.

पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. यात यापूर्वीच विकसित झालेले पिंपळे सौदागर परिसर स्मार्ट सिटी अंतर्गत समाविष्ट करून घेतले. त्यात नव्याने विकसित होणाऱ्या भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्मार्ट सिटीत प्रभाग असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून कामे होत नाहीत. स्मार्ट सिटीचे अधिकारी मुख्य रस्त्यावरती रंगरंगोटी, स्ट्रीट लाईट, फुटपाथ, पेवीन ब्लॉक, झाडे लावण्यात व्यस्त राहतात. त्याच कामांचा झगमगाट वरीष्ठ अधिकारी यांना दाखवत स्वत:ची पाठ थोपटून घेतात. मात्र कुंजीर वस्ती, झिंजुर्ड मळा, केशवनगर व गावठाण भागात अनेक ठिकाणी पाणी साचले जाते. केशवनगर येथील गणाधीश सोसायटी, पारस रेवेरा सोसायटीच्या प्रवेश दारासमोर पाणी साचले. झिंजुर्डे मळा येथे रॉईज सोसायटी मधील नागरिक रात्रीच्या वेळी पाण्यातून वाट काढताना दिसत होते. तर मिलिटरी हद्दीलगत हॉटेल क्रिस्टल रोडवरील हिंद कॉलनी येथील रहिवाशी तर पूर परिस्थिती सारख्या पाण्यातून वाट काढत घरी जात आहेत. त्या पाण्यात रात्रीच्या वेळी अनेक साप दिसून आले. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी पाणी साठल्याचे चित्र दिसत आहे. काही सकल भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबले आहे. मागील तीन चार दिवस मुसळधार पावसाने बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे. कमी उंचीच्या अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर कोकणे चौक ते नाशिक फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक मंदावली होती. यावेळी पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी करत होते. यावेळी नाना काटे यांनी पालिका कर्मचाऱ्यांना आदेश देऊन जेसीबीच्या साह्याने ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यांना वाट मोकळी करून दिली त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




