मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून १८५ ते १९० मते मिळतील, असा अंदाज होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वादर्शक ठरावावेळी १६४ आमदारांची मते मिळाली होती. ही मतसंख्या केवळ काही दिवसांत तब्बल २० मतांनी वाढण्याची शक्यता आहे. भाजपची सातत्याने सुरू असलेली घोडदौड बघता नुकतेच विरोधी बाकांवर गेलेल्या आमदारांनी मतपेटीतून संदेश पाठवायचे ठरवले आहे.
शिंदे गटाने भाजपला पाठिंबा द्यायची तयारी सुरू केली होती तेव्हाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही शिजत असल्याच्या चर्चांना जोर आला होता. राज्यसभा, विधान परिषद आणि पाठोपाठ सरकारबदलामुळे झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे-फडणवीस यांनी उत्तम संख्याबळ संपादित केले. आता काँग्रेसमधील काही आमदार आपले मत कमळदलाचरणी अर्पण करायला सरसावले आहेत, असे विश्वसनीयरीत्या समजते.
काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता असल्याने विधान परिषदेत त्यांनी दाखल केलेले उमेदवार चंद्रकांत हंडोरे पडले. दलित असूनही त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. काँग्रेसचा परंपरागत मतदार त्यामुळे नाराज झाला आहे; मात्र आमदार स्वत:च्याच मर्जीचे मालक असल्याप्रमाणे वागत असल्याने काँग्रेसने अद्याप मते का फुटली हे विचारणाऱ्यांना नोटिशी बजावलेल्या नाहीत. सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला खाशा स्वाऱ्या गैरहजर राहिल्या. त्यांना उशीर का झाला हे विचारणारी नोटीस पाठवण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती, अद्याप ती प्रत्यक्षात आलेली नाही.




