नवी दिल्ली : RBI दोन सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत. या दोन्ही बँकेतील खातेधारक आता आपल्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत किंवा कोणताही व्यवहार करता येणार नाहीय. रिझर्व्ह बँकेकडून कारवाई करण्यात आलेल्या या दोन बँकांमध्ये कर्नाटकस्थित श्री मल्लिकार्जुन पट्टण सहकारी बँक लिमिटेड आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचा समावेश आहे. दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती अस्थिर असल्याचं आरबीआयच्या निदर्शनास आल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार श्री मल्लिकार्जुन पट्टण सहकारी बँक आणि नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेच्या ग्राहकांना पुढील सहा महिने त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. या दोन्ही बँकांवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांची बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. दोन्ही बँकांवरील बंदी पुढील सहा महिने कायम राहणार आहे.
यामध्ये एक सहकारी बँक कर्नाटकातील तर दुसरी महाराष्ट्रातील आहे. मात्र, या बँकांच्या ग्राहकांसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत. नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेच्या ९९.८७ टक्के ग्राहकांच्या ठेवींचा विमा उतरवल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. त्यामुळे या ग्राहकांची ५ लाखांपर्यंतची रक्कम विमा हमी कायद्यांतर्गत परत केली जाईल.




