- १४ लाख ८८ हजार मतदार ठरविणार नवे नगरसेवक
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागानुसार अंतिम मतदार याद्या शुकवार (दि.२२) रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक २४ रावेत मिनी विधानसभा ठरत आहे. या प्रभागात सर्वाधिक ५१ हजार ९८९ इतके मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक ३४ थेरगाव, बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी हा सर्वात कमी २२ हजार ४१२ मतदार संख्येचा प्रभाग ठरला आहे.
महापालिकेच्या मतदार याद्यांवर ८ हजार ७०० हरकती आल्या होत्या. या हरकतींची निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी समक्ष पाहणी केली आहे. त्यानुसार तब्बल ८६ हजार मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात आले आहेत. या अंतिम मतदार याद्या करताना राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपच्या नेतेमंडळींना अनुकूल केल्याची चर्चा आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ८६ हजार ८४९ मतदार आहेत. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघात ५ लाख २७ हजार ७९९ पिंपरी विधानसभेत ३ लाख ७६ हजार ४७० आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडे गावात ९ हजार ५७५ मतदार आहेत. निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, महापालिकेचे एकूण ४६ प्रभाग असून सदस्य संख्या १३९ आहे. सर्व प्रभागातील अंतिम मतदार याद्या महापालिकेने जाहीर केल्या आहेत. मतदारांकडून प्राप्त झालेल्या हरकत सूचनांवर संबंधित प्रगणक, पर्यवेक्षकांमार्फत समक्ष स्थळ पाहणी करून बदल करण्यात आले आहेत.
महिला मतदारांची संख्या एक लाखाने कमी
एकूण १५ लाख ६९३ मतदार आहेत. त्यापैकी १२ हजार ५६४ वगळलेले म्हणजे स्थालांतरित किंवा मयत झालेले मतदार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीला १४ लाख ८८ हजार ११४ मतदारांना हक्क बजाविता येणार आहे. एकूण पुरुष मतदार ८ लाख ३८४, महिला मतदार ६ लाख ८७ हजार ६४२, इतर ८८ असे १४ लाख ८८ हजार ११४ मतदार आहेत. याचाच अर्थ की महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत एक लाख १२ हजार याने कमी आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ
अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्याची २१ जुलै पर्यंत मुदत होती. मात्र, गुरुवारी रात्री उशिरा मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही शुक्रवारी सायंकाळपर्यंत चार प्रभागातील मतदारांची आकडेवारी अंतिम झाली नव्हती. महापालिका निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या सावळा गोंधळामुळे संकेतस्थळावर मतदार याद्या शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत प्रसिध्द झाल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छुकांना नागरिकांना याद्या पाहण्यास मिळाल्या नाहीत.




