पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच आताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले.सध्या राज्यातील परिस्थिती संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची झी 24 तास या चॅनलने ब्लॅक अँड व्हाईट अशी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास केला हे मान्यच आहे.
यावेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही भाजपच्या विरोधात सॉफ्ट भूमिका घेतली आहे. त्यावर त्यांनी सांगितले. मला जेव्हा विरोध करायचा असतो तेव्हा मी विरोध करतो आणि जेव्हा मला कुणाचे कौतुक करायचे असेल तर मी कौतुक सुद्धा करतो. त्यामुळे मी भाजपच्या विरोधात नाही बोललो तर मी त्यांच्याशी सॉफ्ट झालो असं नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केलेला आहे. ही तेथील वस्तुस्थिती आहे. मग मी अजित पवारांचे कौतुक केले तर मी राष्ट्रवादीशी सॉफ्ट झालो का असं होत नाही, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की ज्या ज्या ठिकाणी चांगले काम होत असेल त्याचे मी कौतुक करतो मग यामध्ये भाजप असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा काँग्रेस असो असा मी भेदभाव करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, मी शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारण शिकलो, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादीशी सॉफ्ट झाले का? तर असे होत नाही.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सोबत युती करणार का ? या प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना सांगितले आता तर तसा कोणताही विचार नाही. येणारी परिस्थिती पुढे कशी असेल हे आपल्याला सुद्धा माहित नाही, त्यामुळे त्यावर बोलणे उचित नाही.




