वडगाव मावळ :- माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व मावळ तालुक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माझं गाव माझा स्वाभिमान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (दि.२२)आमदार शेळके यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी पंचायत समिती सभापती दिपक हुलावळे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, संदीप आंद्रे आदि.मान्यवर उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक उपक्रम राबवत गावांच्या प्रगतीसाठी स्पर्धा विकासाची अंतर्गत “माझं गाव, माझा स्वाभिमान” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊन ज्या ग्रामपंचायती..
१) शंभर टक्के करवसुली २) तंटामुक्त गाव ३) आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल शाळा ४) स्वच्छ पाणी पुरवठा ५) घनकचरा व्यवस्थापन ६) खड्डेमुक्त रस्ते ७) शासकीय कर थकित नसलेली ग्रामपंचायत ८) महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणे ९)शासकीय योजना राबविणे १०) हागणदारी मुक्त गाव
या दहा निकषांची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींना मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १० लाख रुपयांचे रोख बक्षिस व याव्यतिरिक्त दहा निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतीना दहा लाख रुपयांचा स्थानिक आमदार निधी देखील देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेतील प्रत्येक निकषासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याने १० पेक्षा कमी निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना देखील याचा लाभ मिळणार आहे. या स्पर्धेमुळे गावातील समस्या व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.ग्रामपंचायतींना स्पर्धेतील सर्व निकष पूर्ण करण्यासाठी पाच महिन्यांचा अवधी मिळणार आहे.
या स्पर्धेत विजयी झालेल्या ग्रामपंचायतीना बक्षिसांचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात येणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
आमदार सुनिल शेळके :- ‘माझं गाव,माझा स्वाभिमान’ ही स्पर्धा विकासासाठीची आहे.त्यात मावळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे.स्थानिकांच्या इच्छाशक्तीतून, सर्वांच्या सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा ध्यास असलेल्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी हे बक्षीस दिले जाणार आहे.या विकासाच्या स्पर्धेसाठी अनेक ग्रामपंचायती नक्कीच हिरीरीने सहभागी होतील,असा विश्वास आहे.




