पिंपरी – सोशल मीडियावर रविवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक कृष्णधवल छायाचित्र जोरदार चर्चेत आले आहे. आपल्या रिक्षा समोर उभा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे २५ वर्षांपूर्वीचे दुर्मिळ छायाचित्र आहे. मुख्यमंत्री शिंदे तरुण वयात रिक्षाचालक होते. त्यामुळे लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत कौतुक केले आहे. मात्र, याची माहिती केल्यावर समजले ही माहिती खोटी आहे. ते छायाचित्रात शिंदे यांचे नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारनेते बाबा कांबळे यांचे आहेत.
कांबळे हे महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही त्यांची स्वत:ची पहिली रिक्षा आहे. एमएच १४- ८१७२ असा तिचा नंबर आहे. त्याच रिक्षासमोर त्यांनी हा फोटो काढला होता. रात्री अकरा ते सकाळी सहा दरम्यान मुंबई आणि राज्यातून अपरात्री येणाऱ्या नागरिकांना पिंपरी चौकातून उपनगरात जाता यावे यासाठी पिंपरीत रातराणी रिक्षा स्टँड तयार केले होते. यामुळे लोकांची गैरसोय टळली. याठिकाणी लोक उतरून रिक्षाने आताची उपनगरे बनलेल्या आणि त्यावेळी ती गावे असलेल्या भागात जायचे. या रिक्षा थांब्याची कल्पना ज्यांना आली ते म्हणजे बाबा कांबळे. तेच संस्थापक-अध्यक्ष बनले.
आता या छायाचित्रा विषयी…! श्रावण महिन्यात पूजाअर्चा असतात. या काळात रिक्षाचालकही वर्गणी काढून एका सोमवारी मंडप उभारून पूजा घालतात. महाराष्ट्रात ही प्रथा आजही कायम आहे. यादिवशी सर्व चालक आपापल्या रिक्षा स्वच्छ धुवून आणि विशेष सजावट करून आणतात. त्या ठिकाणी सामुहिक पूजा होते. १९९७ मधील श्रावण महिन्यामध्ये रातराणी रिक्षा थांब्यासमोर बाबा कांबळे यांचे स्वतःच्या रिक्षा सोबतचे छायाचित्र आहे. आणि हेच समाज माध्यमावर रविवारपासून फिरू लागले. छायाचित्र पसरल्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री शिंदे तरुणवयात रिक्षाचालक होते. यातूनच ते शिवसेना कार्यकर्ता बनले. तेव्हापासून त्यांनी दाढी राखलेली आहे. आणि छायाचित्रात दिसणारे कांबळे यांनीही तरुणवयात दाढी ठेवलेली होती. हे साम्य दिसते.
Q byकांबळे यांना या छायाचित्राविषयी अजिबात माहिती नव्हती. मात्र विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्रभर भ्रमंती असते. सोशल मिडियावर त्यांचे शेकडो ग्रुप आहेत. याच ग्रुपवर हे छायाचित्र विविध ठिकाणांहून येत राहिले. स्वतःचेच छायाचित्र मुख्यमंत्री म्हणून आल्याने ते सुरूवातीला दचकले. मात्र, त्यावरील मजेशीर प्रतिक्रिया वाचून त्यांना मजाही आली. कांबळे यांच्याशी अगदी सुरूवातीपासून परिचय असणाऱ्या व्यक्तींनी त्यांना ओळखले मात्र, अल्पावधीत छायाचित्र इतक्या दूर गेले की खुलासा करता करता साऱ्यांची पुरेवाट झाली आहे.




