पिंपरी :- महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसताना प्रशासक म्हणून मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवला आहे. यासाठी राजेश पाटील यांचे विरोधात शहरातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महापालिका रुग्णालय आणि दवाखान्याच्या औषध उपचाराच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. झोपडपट्टीतील नागरिक, कामगार, मजूर, गरीब पालिका रूग्णालयात उपचार घेतात. प्रशासकांच्या मनमानी निर्णयाला स्थगिती द्या.
पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे शालेय साहित्य टक्केवारीच्या राजकारणामुळे अडकून पडले आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळत नाही, याला पालिकेचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. हे साहित्य वाटप तातडीने करण्याचे आदेश आयुक्तांनी द्यावेत.
याविषयी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत शहरातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवारी (२८ जुलै) पिंपरी पालिकेच्या मुख्यालयासमोर जनआंदोलन करण्यात येणार आहे.




