
सोलापूर : उजनी धरणात सध्या 100 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण प्लस 69 टक्क्यांवर पोचले आहे. 8 जुलैपासून जिल्ह्यात आठ-दहा दिवस पाऊस झाला, पुन्हा तो बंद झाला. पण, पुणे जिल्ह्यात पाऊस झाल्याने वरील धरणांतून पाणी सोडले जात आहे. ते पाणी 14 ते 15 हजाराच्या विसर्गाने दौंडमधून उजनीत येत आहे. त्यामुळे सध्या धरणातील एकूण पाणीसाठा 100 टीएमसीवर गेला आहे.
नेहमीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील धरण पट्ट्यात झालेल्या पावसाच्या बळावरच उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत होती; परंतु तेथेही सध्या पाऊस थांबल्याने उजनीची पाणी पातळी १०० टक्क्यांवर येऊन थांबली आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, पवना, आंध्रा, टेमघर, भाटघर, वीर, गुंजवणे धरण शेत्रात पाऊस थांबला आहे.
राज्यातील सर्वांत मोठे समजले जाणारे तसेच सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणारे उजनी धरण ऑगस्टमध्येच पूर्ण क्षमतेने भरते. गतवर्षी ते 15 ऑगस्टला शंभर टक्के भरले होते, तर दिवाळीतही पाऊस सुरूच असल्याने ते ओव्हर फ्लो झाले होते. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. गतवर्षी 11 टक्के पाणीसाठा होऊनही उन्हाळ्याच्या टप्प्यात ते मायनस 23 टक्क्यांवर गेले होते. यापुढेही उजनी धरण पूर्ण क्षमतेने 100 टक्के न भरल्यास पाण्याचे नियोजन करणे परीक्षेचे ठरणार आहे. तसेच लाभ क्षेत्रातील पिकांनाही पाण्याची टंचाई जाणवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा 111.62 टीएमसी एवढा असून, मृतसाठा 63.66 टीएमसी इतका आहे.
