वडगाव मावळ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सरकार कडून “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने मावळ तहशिलदार कार्यालयाकडून तालुक्यातील २ हजार दारिद्रये रेषेखालील कुटुंबांना मोफत तिरंगा ध्वज देण्यात येणार असल्याचे तहशिलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.
यासाठी लोकसहभागातून तिरंगा ध्वज उपलब्ध करण्यात आले असून, प्रत्येक गावातील रेशन दुकानदार यांच्या मार्फत त्या गावातील दारिद्र्ये रेषेखालील कुटुंबांना तिरंगा ध्वज देण्यात येणार आहे. या उपक्रमास मंगळवार (दि.९) पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी वडगाव येथील तहशिलदार कार्यालयात सर्व रेशन दुकानदार यांना बोलावून त्यांना ध्वजाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तहशिलदार मधुसूदन बर्गे यांनी सर्व नागरिकांना हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने शनिवारी (दि.१३) ते सोमवारी (दि.१५) या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ध्वजारोण करताना प्रत्येक नागरिकाने ध्वज संहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.




