पिंपरी : दुचाकीस्वार महिलेचा अज्ञातांकडून धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. ९) सकाळी आठच्या सुमारास मुंबई-बंगळूर महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे घडली.
संगीता भोसले (३८, रा. मंत्रा हाऊसिंग सोसायटी, तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संगीता तळेगाव दाभाडे येथे राहण्यास होत्या. तर, त्यांची आई मुंबई- बंगळुरू महामार्गावरील थंडा मामला या हॉटेलच्या पाठीमागे राहत आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी संगीता आईसाठी दूध घेऊन गेल्या होत्या. दूध दिल्यानंतर माघारी येत असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी धारदार हत्याराने वार करून त्यांचा खून केला व घटनास्थळावरून पळ काढला.
त्यानंतर काही वेळाने पोलीस नियंत्रण कक्षाला महिलेचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संगीता यांना उपचार कामी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीअंती महिलेचा अपघात नसून निर्घृण खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.



