मुंबई : जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं असं विधान मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नाराज असल्याची कबुली दिली. धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता असून त्याला मंत्रीपद मिळतं असं उपहासात्मक भाष्यही त्यांनी केलं.
जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसवलं आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं आहे. पण याची काही नाराजी नाही. राजकारणात असं चालू राहतं. आम्ही तितके समजूतदार आहोत. फक्त मंत्रिपदासाठी आम्ही गेलो नव्हतो. फक्त मंत्री आहे म्हणून बच्चू कडू नाही. मंत्रीपदापेक्षा बच्चू कडू जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचं जास्त दु:ख नाही,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.



