मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. मात्र, आता खातेवाटपाचं घोंगडं भिजत पडलं आहे. अशावेळी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याजिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. कारण खातेवाटपासह पालकमंत्र्यांची नियुक्तीही अद्याप झालेली नाही. अशावेळी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली. तर काही जिल्ह्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, अशी माहिती सरकारनं दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार?
- देवेंद्र फडणवीस – नागपूर
- सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
- चंद्रकांत पाटील – पुणे
- राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
- गिरीश महाजन – नाशिक
- दादा भुसे – धुळे
- गुलाबराव पाटील – जळगाव
- रविंद्र चव्हाण – ठाणे
- मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
- दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
- रत्नागिरी – उदय सामंत
- अतुल सावे – परभणी
- संदीपान भुमरे – औरंगाबाद
- सुरेश खाडे – सांगली
- विजयकुमार गावित – नंदुरबार
- तानाजी सावंत – उस्मानाबाद
- शंभुराज देसाई – सातारा
- अब्दुल सत्तार – जालना
- संजय राठोड – यवतमाळ
अन्य जिल्ह्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
तर अमरावती जिल्ह्यात विभागीय आयुक्त आणि कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर आणि नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
पालकमंत्रीही तेच राहणार?
शिंदे सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार केला असला तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालं नाही. तसंच पालकमंत्र्यांची निवडही झालेली नाही. स्वातंत्र्य दिनी, प्रजासत्ताक दिनी किंवा महाराष्ट्र दिनी जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. अशावेळी सरकारनं ध्वजारोहणासाठी जाहीर केलेल्या यादीतील मंत्रीच त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.



