कोल्हापूरमध्ये 15 ऑगस्टला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. एका रात्रीत हा निर्णय बदलण्यात आला आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशात चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार होते, तर कोल्हापूरची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. मात्र, आता पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ध्वजारोहण करतील आणि चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये असतील असं नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हानिहाय कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होईल, याबाबत काल आदेश जारी केला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतरही एकनाथ शिंदे सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र 15 ऑगस्टला जिल्ह्यामध्ये कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार? याची चिंता लागून राहिली होती.



