पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची दोन दिवसांपूर्वी (ता.१६) राज्य सरकारने बदली केली. त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आलेले शेखर सिंह यांनी आज संध्याकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर मी हवेत गोळीबार करीत नाही, असे सांगत अभ्यास करून व फीडबॅक घेऊन कामाचा प्राधान्यक्रम ठरविणार असल्याचे त्यांनी पहिल्या पत्रकारपरिषदेत सांगितले. हे करेन, ते करेन, असे मी उगीचच सांगणार नाही, असेही ते म्हणाले.
मावळते आयुक्त पाटील यांच्या अनुपस्थितीत शेखर सिंह यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला. नवीन आयुक्त यांच्या रूपाने शहराला दुसरे आयआयटी पदवीधर तथा आयटी (सॉफ्टवेअर) इंजिनिअर मिळाले आहेत. यापूर्वी श्रावण हर्डीकर हे आयटी इंजिनिअर आयुक्त होते. आपल्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे केला तरीही दिल्लीकर शेखर सिंह मराठी चांगले बोलतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामुळे मी मराठी चांगले शिकलो, माझे मराठी चांगले झाले, तीन वर्षे मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून काम केल्याचा फायदा मराठी चांगली होण्यात झाला, असे ते म्हणाले.
बदलीनंतर गावी गेल्याने इकडे येण्यास उशीर झाला. परिणामी पदभार घेण्यासही उशीर लागला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. पालिका आयुक्त म्हणून राजेश पाटील यांच्या प्रमाणे त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे. त्यातही ती पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात झाल्याचा आनंद असून जबाबदारीचीही जाणीव आहे, असे ते म्हणाले.
नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती करून शहराच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी भर देणार आहे. वेगाने वाढणाऱ्या पिंपरी चिंचवडचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.



