आळंदी (वार्ताहर) : येथील सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देणे, ही ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी आहे. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ती योग्य पद्धतीने पार पाडण्याचे काम केले जाईल.आळंदी ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला शिंदे यांनी केले.
आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.उर्मिला शिंदे यांनी नुकताच पदभार स्वीकारला यावेळी आळंदी येथील विविध संघटनांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले,भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे,माजी नगरसेवक दिनेश घुले,दिनेश कुऱ्हाडे,इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे,कामगार नेते अरुण घुंडरे, शिरिष कारेकर,डॉ.सुनिल वाघमारे,बंडु काळे,आकाश जोशी,ज्ञानेश्वर बनसोडे,संकेत वाघमारे,सदा साखरे यांनी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले.
डॉ.शिदे म्हणाल्या , ‘‘नुकताच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून म्हणून पदभार स्वीकारला आहे. रुग्णालयातील सर्व परिस्थितीची माहिती घेत आहे. प्रत्येक विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर येत आहेत.ग्रामीण रुग्णालय हे सर्वसामान्य रुग्णांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे रुग्णांना उपलब्ध सर्व सुविधा चांगल्या दर्जाच्या व योग्य पद्धतीने मिळाल्या पाहिजेत, याला प्रथम प्राधान्य असणार आहे.ग्रामीण रुग्णालयांत रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.’’ अनेक विभागांत अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून रुग्णांना कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षात घेण्यात येईल.




