भाजपच्या संघटनात्मक पातळीवरच्या महत्वाच्या नेमणुका नुकत्याच जाहीर झाल्या. त्यात महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा संदेश दडला आहे. नितीन गडकरींची पार्लमेंटरी बोर्डातून एक्झिट हा सगळ्यात मोठा शॉक मानला जातोय.
भाजपच्या पक्षीय संघटनेतला सर्वात मोठा बदल जाहीर झाला असून त्यात सर्वात धक्का महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी यांना बसलाय. संसदीय समिती, भाजप पक्षातल्या सर्वोच्च समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आलंय. त्यात काही महत्वपूर्ण बदल पक्षानं केले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षानं आपले दिग्गज नेते आणि नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय मंडळातून काढून टाकण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेऊन लोकांना आश्चर्यचकित केलं.
मात्र, या निर्णयाला संघ नेतृत्वानंही (RSS) सहमती दर्शवल्याचं बोललं जातंय. गडकरींच्या वक्तव्यामुळं आणि भाष्य करण्याच्या प्रवृत्तीमुळं भाजप आणि संघ दोघंही नाराज झाले होते.भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ नेतृत्वानं भाजपचे माजी प्रमुख गडकरींना वेळोवेळी केंद्र सरकार आणि पक्षाबद्दल बोलताना सावध केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नितीन गडकरींनी संघाच्या दृष्टिकोनाकडं दुर्लक्ष केलं. त्यानंतर आरएसएस नेतृत्त्वानं भाजप नेतृत्वाला सुचवलं की, पक्षानं त्यांना संसदीय मंडळातून काढून टाकण्यासह योग्य ती कारवाई करावी.



