औरंगाबाद । दुही हा मराठ्यांना लागलेला शाप आहे, असं वक्तव्य काल उद्धव ठाकरे यांनी केलं, त्याचाच एक दाखला मराठा क्रांती मोर्चातील नेतृत्वातील मतभेदांमध्ये दिसून आलाय. छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व आम्हाला नकोय, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मांडली आहे.
मराठा क्रांती मोर्चाने पूर्वीपासूनच कोणाचंच नेतृत्व नाही, अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनीही या संघटनांचं नेतृत्व करू नये, अशी स्पष्टोक्ती मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. शुक्रवारी या मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी गुरुवारी राज्य शासनासोबत झालेल्या बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे छत्रपती संभाजीराजेंवर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या प्रशासनासमोर स्पष्टपणे मांडणाऱ्या संघटनांमध्येच मोठी फूट पडल्याचे पुढे आले आहे.



