पवनानगर दि. ०२ सप्टेंबर :- पवना धरण परिसरात पर्यटनासाठी मुंबईहून सात जण आले होते. पवना धरण पाणलोट क्षेत्रातील फांगणे गावच्या हद्दीत पवना धरणाच्या पाण्यात सर्वजन पोहत होते. यावेळी त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यातील एकाच्या कामगाराने आरडाओरड केला.
स्थानिक नागरिक अनिल हिलम, संजय आंद्रे, रामदास चव्हाण, रोहिदास काळे, रामदास काळे, स्वप्नील मोकाशी यांनी तत्काळ धाव घेत पाण्यात बुडत असलेल्यांना बाहेर काढले. लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी रफिक शेख व विजय गाले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस हवालदार रफिक शेख यांनी घटनास्थळी जाताच पाण्यात उतरून स्थानिकांच्या मदतीने मयत दोघांना बाहेर काढले, मात्र आर्या दिपक जैन (वय-१३) व समीर कुलदीप सक्सेना (वय-४३, दोघे रा. मुंबई) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. लक्ष (वय-१४), यश (वय-८) व त्यांचे मित्र आर्या जैन (वय-१३), आदी चुगानी (वय-१४), अंश सुरी (वय-१४) या पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.




