कल्याण : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या लोकसभा मतदारसंघासह इतर 16 मतदारसंघात लक्ष केंद्रीत केलं आहे. या 16 मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघांत संघटनात्मक बांधणी, शत प्रतीशत भाजप यासाठी येत्या रविवारपासून माहिती प्रसारण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. भाजपने 16 मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवड केल्याने या मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. मात्र भाजपच्या या मिशनचे शिंदे पितापुत्र समर्थन करणार का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जे मतदारसंघ याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत अशा महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे .या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. या मतदारसंघात भाजपाचा एक मोठा मतदार वर्ग आहे. प्रामुख्याने डोंबिवली शहरात भाजपच्या मतदारांची संख्या अधिक आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी संजय केळकर यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस दौरा करणार असल्याची माहिती दिली आहे.



