मुंबई : गणेश विसर्जना दरम्यान मुंबईमधील नागरिकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गणपती मंडळांना भेटी दिल्या. यावेळी शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आल्याने राजकीय वातावरण तापले. त्यातच शिवसेनेला डिवचण्यासाठी शिंदेगटाचे नेते मनसेच्या स्टेजवर दिसले. शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे मनसे नेते संतोष धुरी यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते.
यामुळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने शिंदे गट आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईत गणेशविसर्जनाआधी राजकारण सुरु झाले आहे.
गणेश विसर्जना दरम्यान दादरजवळील प्रभादेवी परिसरात प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. संजय भगत आणि समाधान सरवणकर यांच्यात आमना सामना झाला. समाधान सरवणकरांकडून म्याव म्यावच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर प्रभादेवी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.
दुसरीकडे दादर परिसरात सदा सरवणकर मनसेच्या स्टेजवर दिसले. मनसे नेते संतोष धुरींसोबत सदा सरवणकर हे उपस्थित होते. या राजकीय योगायोगामुळे मनसे शिवसेना यांच्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. गणेशोत्सवात हिंदुत्वाचा उत्साह पहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विसर्जनासाठी एकत्र आल्याचे सदा सरवणकर म्हणाले.



