मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर मराठवाड्यातील अनेक आमदारांनी शिंदे गटात सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं आता शिवसेनेनं पक्षाचा ढासळलेला बुरुज पुन्हा उभा करण्यासाठी निर्धार अभियानातून शिवसेनेच्या गोटातून सुरुवात केली आहे.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर पक्षातील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या ४० आमदारांमध्ये शिवसेनेच्या मराठवाड्यातील बहुतांश आमदारांचा समावेश होता. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात सहापैकी पाच आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. परंतु आता ढासळलेला बुरुज परत उभा करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी प्लॅनिंग सुरू केलं आहे.
काही दिवसांपू्र्वीच शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बुलडाण्यात हाणामारी झाली होती. त्यानंतर आता युवासेनेचे सचिव तथा शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांच्या नेत्तृत्वात मराठवाड्यात निर्धार अभियानाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शिवसेना मराठवाड्यातील तरुणांना साद घालणार आहे.
महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या निष्ठा यात्रेनंतर युवासेनेनं निर्धार यात्रेची घोषणा केली असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर या यात्रेची सुरुवात होणार आहे. आजपासून २० सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबवलं जाईल. ११ दिवसांच्या या अभियानात मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि अनेक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबवण्यात येणार असून त्यात वरुण सरदेसाई हे तरुणांशी संवाद साधणार आहेत.


