लोणावळा : केंद्र शासनाच्या स्वच्छता लिग या उपक्रमार्गंत आज देशातील महत्वाच्या पर्यटनस्थळांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेने या उपक्रमात सहभाग घेतला होता. लोणावळा स्वच्छताग्रही या नावाने आज लोणावळा शहरातील खंडाळा तलाव ते राजमाची गार्डन व सहारा पुल ते भुशी धरण या दोन पर्यटनस्थळांवर सकाळी आठ वाजता एकाच वेळी लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी, माजी पदाधिकारी, कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी स्वच्छतेची शपथ घेत स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.
सिनेअभिनेत्री व लोणावळा शहरातील स्वच्छतेच्या ब्रॅन्ड अँम्बेसिडर आयशा झुलका यांनी देखील उपक्रमाला हजेरी लावत हातात झाडू घेत स्वच्छता केली. मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील हे लोणावळा स्वच्छताग्रही या उपक्रमाचे कॅप्टन होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण या उपक्रमात सहभागी झाले होते. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, राजु बच्चे, निखिल कविश्वर, आरोग्य समितीच्या माजी सभापती पुजा गायकवाड, रचना सिनकर, प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, शौकत शेख, ललित सिसोदिया, कांचन गायकवाड यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.
लोणावळा शहराने मागील चार वर्ष सलग स्वच्छता अभियानात नेत्रदीपक कामगिरी करत केंद्रीय स्तरावर स्वच्छ शहर हा नावलौकिक मिळवला आहे. यावर्षी लोणावळा नगरपरिषद स्वच्छता अभियानात सहभागी होणार असून प्रथम क्रमांकासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या पहिल्याच स्वच्छता जागर अभियानात नागरिकांनी दिलेला सहभाग पाहता लोणावळा देशातील स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळवेल यात शंका नाही. शाळकरी मुलांनी पथनाट्यं तसेच प्रभातफेरी काढत जनजागृती केली. स्वच्छ लोणावळा बाबत घोषणा दिल्या. आयेशा झुलका यांनी देखील लोणावळा शहरातील नागरिक व पर्यटक यांना आवाहन करताना लोणावळ्यात या आपले स्वागत आहे.
मात्र आल्यानंतर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. झुलका म्हणाल्या आपली सोच बदला, शहरं बदलतील, स्वच्छ होतील, देश देखील बदलेल. जसे आपण स्वतःच्या शरिराची स्वच्छता राखतो तशीच आपल्या परिसराची शहराची स्वच्छता राखल्यास शहरे व समाज निरोगी होण्यास मदत होईल. मुख्याधिकारी पंडित पाटील व माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी नागरिकांना व व्यावसायकांना आवाहन करत लोणावळा खंडाळा शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पुढे असे सांगितले. तसेच रस्त्यावर व अन्यत्र कोठेही कचरा न टाकता घरी येणार्या कचराकुंडीत कचरा टाकण्याचे आवाहन केले तर पर्यटकांनी जागोजागी लावलेल्या लिटरबिन व बाॅटल कलेक्टर मध्ये कचरा व रिकाम्या बाॅटल टाकण्याचे आवाहन केले.




