प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र, हा दिवस धुळ्यात शिवसेनेकडून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक फोटोला चॉकलेट खाऊ घालत शिवसेनेने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सत्तेत येताच दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. या आश्वासनाचा गेल्या ८ वर्षाच्या सत्ताकाळात भाजपाला विसर पडल्याचा आरोप यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या हक्काचा वेदान्त प्रकल्प गुजरातला नरेंद्र मोदींनी पळवल्यामुळे लाखो तरुणांनी नोकऱ्या गमावल्याचा रोष यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, जालन्यातही युवक काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. २०१४ मध्ये दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींनी प्रत्यक्षात दोन कोटी युवकांना बेरोजगार केले आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.



