नवी दिल्ली : चित्ते भारतात आल्यानंतर देशात राजकारण सुरू झाले आहे. भारत छोडो यात्रेत व्यस्त असलेले राहुल गांधी, यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट मध्ये लिहिलं आहे की 8 चित्ते तर आले, आता सांगा 8 वर्षात 16 करोड रोजगार का नाही आले. युवकांचा हा प्रश्न आहे. त्यांनी हे ट्विट ‘राष्ट्रीय बेरोजगार’ हा हॅशटॅग वापरून केले आहे.
तसेच शनिवारी नरेंद्र मोदींचा वाढदिवस आणि राष्ट्रीय बेरोजगार दिवस आहे. दरम्यान, काँग्रेसने नरेंद्र मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करत असल्याचेही सांगितले आहे. नामिबियामधून आठ चित्ते आज भारतात दाखल झाले आहेत. नामिबिया येथून विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे.
मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या चित्त्यांना सोडण्यात आलं आहे. गेल्या जवळपास 70 वर्षांपासून भारतात चित्यांचा वावर नाही. त्यामुळे नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत. यावेळी स्वतः पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्यातून या चित्त्यांचे फोटो काढले आहेत.



