पिंपरी (प्रतिनिधी) – केंद्र सरकार पुरस्कृत ‘अमृत अभियाना’अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शहरांतील घरांना नळजोडणी देऊन पाणीपुरवठ्याच्या बाबतीत १०० टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत पुनरुज्जीवन आणि शहरातील मोकळ्या जागेत उद्याने, हरित क्षेत्र विकसित करणे आणि पहिल्या टप्प्यातील ४४ शहरांमध्ये १०० टक्के मलप्रक्रिया व मलनिस्सारण जोडणी देणे ही दुसऱ्या टप्प्यातील योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. केंद्र सरकारमार्फत ‘अमृत अभियाना’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला आहे.
पालिकेला ५० टक्के स्वहिस्सा उभा करावा लागणार
या अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सादर होणाऱ्या प्रकल्पासाठी संबंधित शहरातील लोकसंख्येनुसार केंद्राच्या अर्थसाहाय्याचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या संस्थांना प्रकल्प किमतीच्या २५ टक्के अर्थसाहाय्य केंद्राकडून मिळणार आहे. मात्र, सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील प्रकल्पांना हे अर्थसाहाय्य मिळणार नाही.
महापालिकेला केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रकल्प किमतीच्या २५ टक्के अर्थसाहाय्य मिळणार आहे. या प्रकल्पासाठी पालिकेला ५० टक्के स्वहिस्सा उभा करावा लागणार आहे. या सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच महापालिकेला आपला स्वहिस्सा उभा करण्यासाठी आवश्यक तरतूद करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने निधीचा खर्च अमृत टप्पा- २ या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे.



