पिंपरी (प्रतिनिधी) – गोरगरीब नागरिकांना धान्याचा लाभ मिळावे, यासाठी शिधापत्रिका कार्यालयाच्या वतीने गिव्ह इट अप मोहिमेसाठी आवाहन केले होते. पिंपरी आणि चिंचवड शिधापत्रिका कार्यालयाअंतर्गत सुमारे ५५० नागरिकांनी शिधा रद्द करण्याबाबत अर्ज दाखल केले आहेत.
नोकरदार, उद्योजक, पेन्शनधारक, इन्कम टॅक्स भरणारे नागरिक, दुकानदार यांना दर महिन्याला धान्याचा लाभ मिळत असल्याने गोरगरीब नागरिक यापासून वंचित राहत होते. त्यासाठी सधन असणाऱ्यांनी शिधा मिळू नये, यासाठी स्वतः अर्ज करावे, असे आवाहन शिधापत्रिका कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार पिंपरी, चिंचवड शिधापत्रिका कार्यालयांतर्गत नागरिक अर्ज करत आहेत.
निगडी परिमंडळ कार्यालयांतर्गत एकूण ७६ हजार ८०१ शिधापत्रिकाधारकांचा समावेश होतो. यामध्ये पिंपरी कार्यालयांतर्गत ३५ हजार ३४२ तर चिंचवड कार्यालयांतर्गत ४१ हजार ५३९ शिधापत्रिकाधारक आहेत. धान्य रद्द करण्याबाबत पिंपरी कार्यालयांतर्गत १९१ शिधापत्रिकाधारकांनी धान्य रद्द करण्यासाठी अर्ज केले आहे. तर चिंचवड कार्यालयांतर्गत ३४७ जणांनी अर्ज केले आहेत.
‘गिव्ह इट अप’ मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही कार्यालयांतर्गत आम्हाला साडे पाचशे अर्ज प्राप्त झाले आहेत. नागरिक स्वतःहून यासाठी अर्ज करत आहेत.
• दिनेश तावरे, परिमंडळ – अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय.




