नवी दिल्ली : पंजाबमधील चंदीगड विद्यापीठात शालेय विद्यार्थ्यांमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हे व्हिडीओ लीक केल्याचा आरोप केला जात आहे. या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची दखल पंजाब महिला आयोगानेही घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाले आहेत.
या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी या मुलींनी आत्महत्या केल्याचे खोटी बातमी व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला व अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात मोठा मोर्चा काढला. यावेळी पोलिसांना त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तरीही विद्यार्थ्यांचा उद्रेक कमी होत नाही हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीच्या आठ विद्यार्थिनींनी एकाच वेळी आत्महत्येचा प्रयत्न केला. याच विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने 60 विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शिमल्यात राहणाऱ्या एका मित्राला पाठवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर व्हिडीओ बनवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



