पिंपळे गुरव (वार्ताहर) पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडी येथील पुणे-मुंबई महामार्गालगत मुख्य ड्रेनेजलाइन आहे. दापोडी येथील अरुण चित्रपट टॉकीज परिसरात महामेट्रोचे काम सुरू आहे. हे काम करताना ड्रेनेजलाइनला धक्का लागल्याने मागील काही महिन्यांपासून येथील ड्रेनजलाइन सातत्याने तुंबत आहे. परंतु याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग व मेट्रोचे प्रशासन लक्ष देत नसल्याने दापोडी येथील सर्वसामान्य नागरिकांच्या घरांत ड्रेनेजचे पाणी शिरले आहे.
दापोडी येथील लिंबोरे वस्तीमधील नागरिकांच्या घरांत ड्रेनेजलाइन तुंबल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी शिरले. त्यामुळे लिंबोरेवस्तीमधील नागरिकांच्या घरांत हे दूषित पाणी शिरल्याने त्यांचा संसार सांडपाण्यात पोहोत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना घरात राहणे अशक्य झाले आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बनलाय गंभीर
मागील काही महिन्यांपासून मेट्रोशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी जबाबदारी घेणारा एक ही अधिकारी जागेवर नसतात. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून येथील नागरिक या समस्येचा सामना करत आहेत. माजी नगरसेविका स्वाती काटे यांनी महापालिका प्रशासन आणि मेट्रोशी वारंवार संपर्क साधून येथील समस्येविषयी माहिती दिली. परंतु प्रशासन उपाययोजना करत करतना दिसून येत नाही.




