पिंपरी ( प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप बाबुराव जांभळे – पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती झालेल्या स्मिता झगडे यांचा आदेश रद्द करून दहा दिवसात त्याची गच्छंती केली आहे. त्यांना पुन्हा मूळ उपायुक्त पदावर महापालिकेतच कामकाज करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी गुरुवारी (दि. २२) रोजी काढले आहेत. दहा दिवसांतच झगडे यांची नियुक्ती रद्द केल्याने पालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. केवळ अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना पदावरून दूर करण्यासाठी स्मिता झगडे यांचा वापर केला का अशीही चर्चा होताना दिसत आहे.
दहा दिवसातच स्मिता झगडे यांच्या पदोन्नतीचा आदेश रद्द
अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेले जांभळे पाटील यांची पिंपरी महापालिकेत दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची १३ सप्टेंबर रोजी बदली करण्यात आली. त्यानंतर उपायुक्त झगडे यांची पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. मात्र, आता तो आदेश रद्द करण्यात आले आहेत.




