पिंपरी ( प्रतिनिधी)– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अजब कारभाराचा गजब नमुना समोर आला आहे. नागरिकांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारणाऱ्या महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे चिखली, कुदळवाडी येथे नाल्यावरच तीन एलएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे निदर्शास आले आहे. या प्रकल्पासाठी तब्बल आठ कोटी रूपये खर्च होणार आहेत.
चिखली, कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. तसेच या भागात लघुउद्योग, भंगार गोदामे मोठ्या प्रमाणात आहेत. कारखान्याचे पाणी, सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वारंवार महापालिकेला चिखली परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून मार्करस या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या कामासाठी महापालिका आठ कोटी रूपयांचा खर्च करणार आहे.
देहू-आळंदी रस्त्यालगत कुदळवाडी परिसरात भला मोठा नाला आहे. या नाल्यातील पाणी थेट इंद्रायणी नदीत जात आहे. त्यामुळे याच नाल्यावर महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू आहे. दुसरीकडे वाढत्या नागरिकरणामुळे शहरातील नैसर्गिक ओढे-नाले बुजवून उंचच्या उंच इमारती उभ्या केल्या जात आहेत. यावर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कधी कारवाई करतो तर कधी-कधी सोयीस्करपणे कानाडोळा करत आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी पालिका अतिक्रमणावर कारवाई करणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.




