नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे १६ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्वच्छता पखवाडा अर्थात स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो आहे. या स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून ई-कचरा जागरूकता निर्माण करण्यासाठी टाटा उद्योगाच्या क्रोमा स्टोअर्स आणि इंडिया टुरिझम मुंबई यांनी हातमिळवणी केली आहे. देशातील सर्वात जास्त वेगाने वाढणाऱ्या कचऱ्यामध्ये ई-कचन्याचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ई- कचऱ्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा टाकून देताना उद्भवणारी आव्हाने विचारात घेऊन हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. व्यवस्थापनाबाबत अलिकडच्या काळात वापरातील उपकरणे अपग्रेड करण्याची आणि नवी उपकरणे खरेदी करण्याची लोकांची हौस वाढली आहे. या समस्येच्या निराकरणात हातभार लावता यावा, यासाठी इंडिया टुरिझम मुंबई आणि क्रोमा यांनी आपल्या ग्राहकांच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विल्हेवाट लावण्यासाठी ‘जस्टडिस्पोज’ सोबत भागिदारी केली आहे.
वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याबरोबरच ग्राहकांना जबाबदारीने ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. वेगवेगळी अद्ययावत उपकरणे, हा आधुनिक भारतातील नागरिकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. ई-कचऱ्याचे शाश्वत पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढविणे गरजेचे आहे.



