पिंपरी (प्रतिनिधी) शहरात दापोडी ते चिंचवड स्टेशनपर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मार्गिकेच्या दुभाजकांत माती, खत टाकून शोभिवंत रोपे लावण्यासाठी महामेट्रोने अखेर निविदा काढली आहे. कामाचे आदेश दिल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.
दापोडीच्या हॅरिस पुलापासून चिंचवडच्या मदर उड्डाणपुलापर्यंत अशी सुमारे साडेसात किलोमीटर अंतराची मेट्रोची मार्गिका करण्यात आली आहे. ६ मार्चपासून पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो धावत आहे. मार्गिका उभारून दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तसेच, विविध सहा स्टेशनची कामे पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. त्यामुळे मार्गिकेच्या खालील रस्त्यांवरील दुभाजकात रोपे लावून सुशोभीकरण करण्याची मागणी जोर धरत होती.
काहींनी महामेट्रोस पत्रही दिले होते. दुभाजक खुले असल्याने त्यात पावसाचे पाणी साचत होते. तसेच, झाडेझुडपे उगवली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत टेरेसा आहे. त्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेऊन महामेट्रोने त्या कामासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात ठेकेदाराची निवड करण्यात आली आहे. लवकरच वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. त्यानंतर शहरातील दुभाजक रोपे लावून सुशोभित करण्यात येणार आहे.




