पुणे : शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता राज्यातील खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचे पगार राज्य सरकार करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे.
पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण ही सरकारची जबाबदारी असल्याचं सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काच्या ओझ्यातून दिलासा देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. शासकीय महाविद्यालयांच्या तुलनेत खाजगी महाविद्यालयांची फी कितीतरी पटींनी अधिक असते. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण स्वस्त व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून वर्षाकाठी प्राध्यापकांच्या पगारासाठी 12 ते 13 हजार कोटींची तरतूद करण्याची तयारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी दर्शवली आहे


