सध्या शिवसेना ही शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक अशा दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. या दोन्ही गटांत संघर्ष न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेवरील प्रभुत्व दाखवण्यासाठी चढाओढ लागली आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याचे एक टीझर तसेच पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण तसेच शिवसेनेशी निगडित असलेल्या सर्व प्रतिमा, प्रतिकांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पोस्टर्समध्ये नेहमी दाखवण्यात येणाऱ्या वाघाचे चित्रही शिंदे गटाने आपल्या पोस्टरमध्ये दाखवले आहे.
डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा फोटो आणि शिवसेना यांच्यात विशेष नाते आहे. शिवसेना पक्षातर्फे या वाघाचा फोटो हमखास वापरला जातो. शिंदे गटाच्या पोस्टरमध्येही शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासोबतच डरकाळी फोडणाऱ्या वाघाचेही चित्र देण्यात आले आहे. सोबतीला बाळासाहेब ठाकरे यांचा तरुणपणातील फोटो घेण्यात आला असून, एक नेता एक पक्ष असे शिंदे गटाने म्हटले आहे. एकंदरीतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ, शिवसेनेचे धनुष्यबाण, आनंद दिघे, अशी सर्वच प्रतिकं आणि चित्रे या पोस्टरमध्ये झळकली आहेत.



