शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदेंची राष्ट्रीय नेता म्हणून निवड केल्याचंही अब्दुल सत्तारांनी सांगितलं. अब्दुल सत्तार गुरुवारी (२९ सप्टेंबर) जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, “जे जे ठाकरे गटात आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून शिंदे गटात यावं. आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय नेते म्हणून निवड केली आहे. ते आता राष्ट्रीय नेते आहेत. त्या नेत्याच्या छत्रछायेखाली एका भगव्याखाली यावं. एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनावर चालत आहेत. त्यांचा आशिर्वाद शिंदेंच्या पाठिशी आहे. जे जे बाहेर असतील त्यांनी एकनाथ शिंदेंना नेता म्हणून मान्य करावं. भविष्यातील शिवसेना एकनाथ शिंदेंची असेल आणि त्यांच्याकडेच धनुष्यबाण चिन्ह असेल,” असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.



