कामशेत (वार्ताहर) कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३०) करण्यात आली आहे. सरपंच अनिल बाळू येवले (वय ३३) व ग्रामसेवक अमोल तात्यासाहेब थोरात ( वय (३४) अशी कारवाईदरम्यान अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदाराने चुलत आजी, आजोबा यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र तसेच त्यांचे चुलत आजोबा यांच्या मृत्यू प्रमाणपत्राचे मागणी अर्ज व हरकती अर्ज यांच्या प्रती मिळण्याकरता तक्रारदार यांनी ग्रामपंचायत कुसगाव खुर्द येथे दिनांक २६ सप्टेंबरला अर्ज दिला होता. ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यांनी दाखले देण्याकरिता १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच ग्रामसेवक थोरात यांनी सरपंच येवले यांनी केलेल्या लाच मागणीस प्रोत्साहन दिले व सरपंच यानी लाच रक्कम आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सरपंच येवले व ग्रामसेवक थोरात यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे..
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, चालक पोलीस शिपाई प्रशांत वाळके यांच्या पथकाने केली आहे.




